सतिश शेट्टी व सहकाऱ्यांना आतंरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरण प्रमाणपत्र
प्रभात पर्व न्यूज - Published: 21-Apr-2019 01:48 pm
तळोजा : सतीश शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांना आतंरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरण प्रमाणपत्र देण्यात आला आहे. सीईटीपीचे संचालक मंडळ बरखास्त होण्यापूर्वी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सतीश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सीईटीपच्या संचालकांनी आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतले होते. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शनिवारी (२० एप्रिल) संबंधित संस्थेने या संचालकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर प्रदूषणाच्या मुद्द्यावर तळोजा सीईटीपीवर राष्ट्रीय हरित लवादाने १० कोटींचा दंड ठोठावला होता. यावेळी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सीईटीपचे सर्व संचालक आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतील, असे प्रतिज्ञापत्र सीईटीपी प्रशासनाकडून हरित लवादाकडे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार सीईटीपीच्या संचालक मंडळामार्फत सतिश शेट्टी, प्रकाश लाेगावी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन संचालकांनी ॲास्ट्रेलियन इन्स्टीट्यूट ॲाफ वाॅटर सायन्स या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून १०० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले. सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा शास्त्रोक्तरित्या चालविण्याचे काैश्यल्य आत्मसात करण्यासाठी व त्याबाबतचे अत्याधुनिक ज्ञान व प्रात्यक्षिके उपलब्ध करुन देण्यासाठी भारतात प्रथमच संचालक मंडळ व सीईटीपी संचालकांसाठी अशा प्रकारचा प्रशिक्षण कोर्स पूर्ण करण्यात आला.
संबंधित प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सतिश शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांना ॲास्ट्रेलीयन इन्स्टीट्यूट ॲाफ वाॅटर सायन्स या संस्थेचे अध्यक्ष प्रा. फिलीप्स यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पर्यावरण प्रमाणपत्र देण्यात आले. या समारंभामधे बाेलताना प्रा. फिलीप्स यांनी सांगितले की आॅस्ट्रेलियामधे हा काेर्स केल्याशिवाय काेणीही सांडपाणी यंत्रणेवर कामकाज करू शकत नाही. हे काेर्स सर्व प्रदूषित उद्याेगांच्या ॲापरेटर्सनी पर्यावरण संरक्षण व सुधारण्यासाठी करणे आवश्यक आहे. तळाेजा व इतर औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्याेगांना त्यांच्या वसाहतीमधे किंवा पुणे विद्यापीठांमध्ये शनिवार व रविवारी हा काेर्स सप्टेंबर पासून करता येईल.
यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त विधी विभाग प्रमुख द. त्रि. देवळे यांनी असे स्पष्ट केले की, सर्व सी.ई.टी.पी.च्या सांडपाणी संयंत्रणाचे आयुष्य संपत आलेले आहे. नविन अत्याधुनिक संयंत्रणा बसविणे आवश्यक आहे. मात्र या संस्थांकडे आवश्यक निधी व तंत्रज्ञान नसल्यामुळे काही काळावधीसाठी सीईटीपीचा कारभार एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. यावेळी सतिश शेट्टी यांनी सीईटीपी चालविताना येणाऱ्या अर्थिक व तांत्रिक अडचणी, तसेच काेर्समुळे हाेणारे फायदे सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राजपूत व तळोजा एमआयडीसीचे दिपक बोबडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच कविता टकले यांनी उपस्थितांचे आभार मानले.


