तळोजा एमआयडीसीतील आणखी आठ कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा
प्रभात पर्व न्यूज - Published: 19-Oct-2020 11:26 am
तळोजा : तळोजा एमआयडीसी परिसरामधील प्रदूषणामध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी येत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून आणखी आठ कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत. या आठ कारखान्यांपैकी अल फैजान मरीन प्रॉडक्ट्स, स्टार फिश मिल ॲन्ड ऑईल कंपनी, ग्लोबल मरीन एक्सपोर्ट्स, कैरव केमोफर्ब इंडस्ट्रीज लिमिटेड या चार कारखान्यांना 'क्लोजर नोटीस' म्हणजे कारखाने बंद करण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय आयजीपील या कारखान्यासाठी प्रस्तावित आदेश देण्यात आले असून हायकल, महाविर केमिकल कारणे दाखवा' नोटीसा बजावल्या आहेत. तसेच पडघे गावाशेजारील नदीकाठी रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखानदाराने घातक रासायनिक कचरा मोकळ्या जागेवरच टाकला होता. याप्रकरणी संबंधित मालकावर कारवाई करण्यात आली असून सदर रासायनिक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने बंद असताना तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. परंतु आता अनलॉकनंतर कारखाने सुरू झाल्यानंतर प्रदूषणात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यापूर्वी चार कारखान्यांवर कारवाई करण्यात आली असून आता आणखी आठ कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत. दरम्यान, या कारवाई संदर्भात नागरीकांच्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून केवळ कारवाई फार्स न दाखवता प्रदूषणाच्या समस्येपासून सुटका मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.