तळोजा एमआयडीसीतील ॲक्युप्रिंट कंपनीत कोरोनाचा कहर; पनवेल महापालिकेकडून कंपनी सील
प्रभात पर्व न्यूज - Published: 06-Jul-2020 01:04 am
तळोजा: तळोजा एमआयडीसीतील ॲक्युप्रिंट कंपनीत तब्बल ३५ ते ४० कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिका प्रशासनाकडून ही कंपनी सील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून सुद्धा, या कंपनीचे कामकाज सुरूच होते. धक्कादायक बाब म्हणजे, या कंपनीत कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याचे कामगारांना माहिती मिळाली होती. परंतु कंपनी प्रशासनाकडून जबरदस्तीने कामगारांना कामावर येण्यास सांगितले जात होते. तसेच कामावर न आल्यास काढून टाकण्याची धमकीही दिली जात होती. त्यामुळे नाईलाजाने, कामगार कंपनीत येत होते. याबाबत, स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांना मिळताच, त्यांनी कामगारांना कंपनीच्या बाहेर काढून कंपनी बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर महापालिकेकडून या कंपनीला कुलूप ठोकण्यात आले आहे.
पनवेल तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून तळोजा एमआयडीसीमधील अनेक कारखान्यांत कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. येथील ॲक्युप्रिंट कंपनीत तर तब्बल ३५ ते ४० कामगारांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी सुद्धा या कंपनीचे कामकाज सुरूच होते. या कंपनीत घोट गावातील कामगार असल्याने स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांना माहिती मिळताच, कामगारांना कंपनीच्या बाहेर काढून कंपनीचे कामकाज बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर महापालिका प्रशासनाला याबाबत कळविल्यानंतर महापालिकेने तातडीने कारवाई करत कंपनी सील केली आहे. ज्ञानेश्वर पाटील यांच्या म्हणण्यानुसार, काही जणांचे अहवाल येणे बाकी असून या कंपनीतील आणखी काही कामगार कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनी विरोधात कडक कारवाईची मागणी ज्ञानेश्वर पाटील यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख तसेच प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्याकडे केली आहे.
